
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पत्नीच्या अनैतिक संबधावरून निर्माण झालेल्या वादातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदिया शहराला लागून असलेल्या कुडवा येथे बुधवारी २७ मे रोजी रात्री ८.१७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. राजेंद्र उर्फ राजेश कटरे (४४) रा. कुडवा असे मृताचे तर अनिता राजेश कटरे (३५) व संजय श्यामलाल लिल्हारे (४२) अशी दोन्ही आरोपींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजेश हा दुसरी पत्नी अनिता हिच्यासोबत कुडवा येथे राहत होता. त्यातच अनिताचे गेल्या दिड वर्षापासून आरोपी संजय याचेशी अनैतिक संबंध होते. यातूनच मृत राजेश व अनिता यांच्यात वाद होत असत.
घटनेच्या दिवशी मंगळवार, २६ मे रोजी घराच्या कागदपत्रांवरून तसेच पत्नीचे संजय सोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्याचाच राग मनात ठेवत त्याच रात्री ३ वाजताच्या सुमारास राजेश झोपलेला असताना आरोपी पत्नीने तिच्या साथीदाराला घरी बोलावून राजेश झोपेत असतानाच त्याचा गाळा आवळून व उशीने तोंड दाबून त्याला ठार केले. याप्रकरणी राजेशची बहिण नर्मदा दिनेश पंधरे (५१) रा. काटी ता. गोंदिया यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली यावेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता दोघांनीही संगनमत करून राजेशचा खून केल्याचे कबूल केले. दरम्यान, स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे करीत आहेत.
असा फुटला बिंग….
मृताची मोठी बहिण नर्मदा पंधरे यांना राजेशच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर त्या कुडवा येथे आल्या, यावेळी त्यांना राजेशच्या गळ्यावर जखमा व गळा दाबल्याचे दिसून आले. यावरून त्यांचा संशय बळावला दरम्यान, त्यांनी रामनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयावरून आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली. यावेळी दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली.
रविवारपर्यंत पोलिस कोठडी…
रानमगर पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.