
चंद्रपूर: तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत मोटेगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप जानबा ननावरे (वय ४५, रा. मोटेगाव) असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, मोटेगाव ते पेंढरी मार्गावरील बद्री पहाडी परिसरातील कक्ष क्रमांक ३८ मध्ये ननावरे हे नेहमीप्रमाणे बकºया चारण्यासाठी गेले होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने मृतदेह सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, ननावरे यांच्यासोबत असलेल्या बकºया सैरावैरा पळाल्यानंतर घरी परतल्या. मात्र ननावरे घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने तो काही मुलांसह जंगल परिसरात शोध घेण्यासाठी गेला. यावेळी घटनास्थळी फाटलेले कपडे आणि कुºहाड आढळून आली. त्यानंतर गावकºयांनी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आढळून आला. स्थानिकांच्या माहितीनुसार, याच परिसरात सकाळी आठच्या सुमारास वाघ दिसल्याचे काही महिला मजूर तसेच नागरिकांनी सांगितले होते. रोपवाटिकेजवळ रस्ता ओलांडताना वाघ दिसल्याची माहितीही समोर आली आहे. ५० हजारांची तातडीची मदत या घटनेनंतर वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांना तातडीची ५० हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली आहे. उर्वरित अनुदानाची रक्कम शासनाच्या नियमानुसार लवकरच देण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली.