शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिंदेवाही : सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक येथील शेतात असलेल्या उघड्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू झाला. ही माहिती रविवार, ३१ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वनविभागाला प्राप्त झाली. चारगाव (बुज.) येथील शेतकरी पांडुरंग गोविंदा गजभिये यांच्या गट क्रमांक ५१ मधील शेतात कठडा नसलेल्या सिमेंट बांधकामाच्या विहिरीत अंदाजे २५ ते ३० फूट पाणी साचलेले होते. या पाण्यात एक वाघ मृतावस्थेत तरंगताना आढळून आला. माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार-बोरावार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, वनरक्षक एस. बी. चौधरी तसेच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या प्राथमिक तपासणीत संबंधित वाघ हा अंदाजे ७ ते ८ वर्षे वयोगटातील नर वाघ असल्याचे निष्पन्न झाले. नायलॉन दोर व वाघरीच्या सहाय्याने वाघाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे निदर्शनास आले असून, कोणत्याही प्रकारच्या शिकारीची किंवा अवयव चोरीची चिन्हे आढळून आली नाहीत, अशी माहिती वनविभागाने दिली आहे. घटनास्थळी उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर., सहायक वनसंरक्षक अरविंद जे., राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे प्रतिनिधी बंडू धोत्रे, स्वॅब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद सुर्यवंशी, पशुधन विकास अधिकारी बजरंग सावरे यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक निष्कषार्नुसार, विहिरीतील पाण्यात पडल्याने बुडून वाघाचा मृत्यू झाला आहे. पंचनामा, शवविच्छेदन व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरवनाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी व पंचांच्या उपस्थितीत मृत वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास व कार्यवाही ब्रह्मपुरी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही वनपरिक्षेत्रामार्फत सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *