
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) तर्फे आॅपरेशन नार्कोस अंतर्गत मादक पदार्थांच्या तस्करी विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून गांजाची वाहतूक करणाºया एका तस्कराला एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा गांजासह मंगळवारी २ जून रोजी आमगाव रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. शीतल चींधालोरे, रा. धानोली, ता. आमगाव, जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रेल्वेमार्गे होणाºया मादक पदार्थ, मद्य व तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत २ जून २०२६ रोजी आमगाव रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले प्रधान आरक्षक राजेश कुमार यांनी गाडी क्रमांक १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आल्यानंतर जनरल डब्यातून एका संशयित व्यक्तीला प्लास्टिकची पिशवी घेऊन जाताना पाहिले. संशय आल्याने त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्या ताब्यातील पिशवीत २.०९० किलो मिळून आला. सदर गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची किमत अंदाजे १ लाख ४ हजार ५०० रुपये इतकी आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी जीआरपी गोंदिया यांच्या ताब्यात देण्यात आले. जीआरपीतर्फे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.