
ढोल ताशा पथक महाराष्ट्रातील गणेशोत्सवाशी जोडलेला अत्यंत समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा आहे. या परंपरेची सुरुवात पुण्यात डॉ. अप्पासाहेब पेंडसे यांनी केली. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला, ‘ज्ञान प्रबोधिनी’ या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती आणण्यासाठी ढोल आणि ताशा वादनाची सुरुवात केली. १९६५ मध्ये पुण्यात गणेशोत्सवादरम्यान दंगल झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीत वाद्ये वाजवण्यास सक्त मनाई केली होती. अशा तणावपूर्ण आणि निरुत्साही वातावरणात, अप्पासाहेबांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा पथक उतरवले.
हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आणि इथूनच औपचारिक ‘ढोल-ताशा पथका’ची पायाभरणी झाली. ढोल (मोठे दंडगोलाकार वाद्य) आणि ताशा (उच्च पट्टीतले वाद्य) यांच्या साथीलाझांज, ध्वज आणि शिस्तबद्ध पावले असतात. आज गणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुका तसेच शिवजयंती यांसारख्या उत्सवांत ढोलताशा पथक हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे व ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. ढोल आणि ताशा ही मंगलवाद्ये म्हणून सण उत्सव तसेच विशेष कार्यक्रमात वाजविण्याची पद्धती प्रचलित आहे. महाराष्ट्राचा हा वारसा आता सातासमुद्रापार गेला आहे. हाच सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी नागपूर बेसा येथील जयंती नगरी-७ मधील नागरिकांनी ‘गणराज ढोल ताशा’ पथकाची स्थापना केली असून शनिवार ६ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेक दिनी वादनाने शुभारंभ होत आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी जयंती नगरी-७ मधील नागरिकांनी एकत्र येऊन पथक स्थापन करण्याचा विचार केला. या विचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पाहता पाहता मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी झाली.
पथकात जवळपास ८० सदस्य आहेत. ढोल, ताशा आदी सर्व साहित्यानिशी पथक सुसज्ज असून गेल्या दोन महिन्यात सर्व सदस्यांनी परिश्रमपूर्वक सराव करून वादन शिकले आहे. एखाद्या सोसायटीमध्ये स्थापन होणारे हे महा- राष्ट्रातील पहिले पथक असणार आहे. पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी दहा वर्षाच्या मुलांपासून ते साठ वर्षांच्या वरिष्ठ सदस्यांचा पथकात समावेश आहे. एक विचार घेऊन एकत्र आलेल्या जयंती नगरी-७ मधील नागरिकांनी प्र-ि शक्षण व मेहनत घेऊन गणराज ढोल ताशा पथकाला आकार दिला आहे. यासाठी सोसायटीमधील सर्व रहिवाशांची अतिशय मोलाची साथ व प्रोत्साहन मिळाले ही बाब पथकाची जमेची बाजू आहे. ६ जून शिवराज्याभिषेक दिनी पथक आपल्या पहिल्या वहिल्या वादनाने पूर्णत्वास येत आहे. पथकातील सर्व सदस्यांनी यासाठी गेली अनेक दिवस परिश्रम घेतले आहेत. “एकच नाद, एकच ताल”, ही टॅग असलेले गणराज ढोल ताशा पथक शिवराज्याभिषेक दिनापासून लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. ढोल ताशा हा केवळ वाद्यसंग्रह नाही, तर महाराष्ट्राची जीवंत परंपरा, शिस्त आणि उत्साह आहे. ढोल-ताशाचे ठेके केवळ संगीत नव्हे तर ऊर्जा, एकता आणि महाराष्ट्रीयन अभिमान व्यक्त करतात. ही एकता, ही ऊर्जा, ही परंपरा गणराज ढोल ताशा पथकाच्या रूपाने जयंती नगरी-७ मध्ये रुजणार आहे. हा क्षण जयंती नगरीवासीयांसाठी अभिमानाचा असणार आहे.
रवी गिते, नागपूर