
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाºया खासगी वाहनांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात मा. परिवहन मंत्री तसेच नव्याने रुजू झालेल्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी (कढर) यांच्या निर्देशानुसार भंडारा विभागात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार व्यवस्थापक यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात येत असून, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे. दि. ५ जून ते १५ (फळड) जून या कालावधीत संयुक्त कारवाई केली जाणार असून, बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांनी प्रवासी वाहतूक केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
भंडारा विभागांतर्गत भंडारा, पवनी, साकोली, लाखनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर, मोरगाव अर्जुनी, देवरी, गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि गोरेगाव येथील सर्व बसस्थानकांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद व नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहतुकीस बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, या आदेशाचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याने राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत राज्यभर ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहतूक रोखली जाऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेला बळकटी मिळेल, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेतही वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.