
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या पिग्मी एजंटांना मिळणाºया कमिशनमध्ये करण्यात आलेल्या कपातीविरोधात लाखांदूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी ४ टक्के मिळणारे कमिशन थेट २.५० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून त्यामुळे हजारो एजंटांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप करीत लाखांदूर तालुक्यातील पिग्मी एजंटांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेऊन पूर्ववत ४ टक्के कमिशन लागू करावे, या मागणीसाठी मा. सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लाखांदूर यांच्यामार्फत ३ जून रोजी निवेदन सादर करण्यात आले. प्राप्त निवेदनानुसार, राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये कार्यरत पिग्मी एजंटांना यापूर्वी संबंधित पतसंस्था त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार ४ टक्के कमिशन देत होत्या. मात्र, मा. सहकार आयुक्त व निबंधक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या आदेशानंतर जिल्हा निबंधक व उपनिबंधक स्तरावर बैठका घेऊन पिग्मी एजंटांना २.५० टक्क्यांपेक्षा अधिक कमिशन देता येणार नाही, असे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे एजंटवर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.