
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गोपनीय, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीत एकूण ४५७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. मतदानाची गोपनीयता अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघ तथा जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने १८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानुसार भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात एकूण चार मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. भंडारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद भंडारा, नगर परिषद भंडारा, तुमसर, पवनी आणि नगर पंचायत मोहाडी येथील मिळून १६६ मतदार मतदान करतील. साकोली येथील मतदान केंद्रावर नगर परिषद साकोली, नगर पंचायत लाखनी आणि लाखांदूर येथील ६१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद गोंदिया, नगर परिषद गोंदिया, तिरोडा आणि गोरेगाव येथील एकूण १५४ मतदार मतदान करतील. तर सडक अर्जुनी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर नगर परिषद सालेकसा, नगर पंचायत देवरी, सडक अजुर्नी आणि अर्जुनी (मोरगाव) येथील ७६ मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. विशेष म्हणजे या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना उमेदवारांना पसंतीक्रम देऊन मतदान करावे लागणार आहे.
मतदान करताना मतदाराने दिलेला पसंतीक्रम आणि त्याचे मतदान पूर्णपणे गोपनीय राहील. निवडणूक प्रक्रियेतील गोपनीयता जपणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था प्रशासनाने केली आहे. भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी यंदा तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहा मतदान पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांचे पहिले प्रशिक्षण ५ जून रोजी पूर्ण झाले असून दुसरे प्रशिक्षण १२ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे पार पडणार आहे.
निवडणुकीसाठी वैनगंगा सभागृह, भंडारा येथे सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच मतमोजणीची व्यवस्था पोलीस बहुउद्देशीय सभागृह, भंडारा येथे करण्यात आली असून २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून होणाºया या महत्त्वाच्या निवडणुकीत मतदानाची गोपनीयता, मतदारांचा स्वतंत्र निर्णय आणि पारदर्शक प्रक्रिया यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघ तथा जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी व्यक्त केला आहे.