साकोली न.प.च्या सेवेत शववाहिनी व गटर सफाई मशीन दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व तातडीच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने साकोली नगर परिषदेच्या ताफ्यात शासनाकडून आधुनिक वातानुकूलित शववाहिनी तसेच अत्याधुनिक गटर सफाई मशीन वाहनाची भर पडली आहे. यामुळे शहरातील आरोग्य, स्वच्छता आणि आपत्कालीन सेवांना नवे बळ मिळणार असून नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि प्रभावी सेवा उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी आमदार नाना पटोले यांनी आपल्या निधीतून नगर परिषदेला शववाहिनी उपलब्ध करून दिली होती, तर एक जुने गटर सफाई मशीन वाहनही नगर परिषदेकडे कार्यरत होते. आता नव्या वाहनांच्या समावेशामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजा अधिक सक्षमपणे पूर्ण करणे शक्य होणार आहे.

शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नगर परिषदेला अत्याधुनिक वातानुकूलित शववाहिनी प्रदान करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरिक २.०) अंतर्गत आधुनिक गटर सफाई मशीन वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नव्या वाहनांमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक गतिमान होणार असून गटारांची यांत्रिक पद्धतीने प्रभावी सफाई करण्यास मदत मिळणार आहे. त्याचबरोबर शववाहिनी सेवाही अधिक सन्मानजनक व सोयीस्कर पद्धतीने नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नगर परिषदेकडे आता एकूण दोन शववाहिन्या आणि दोन गटर सफाई मशीन वाहनांची सुविधा उपलब्ध झाली आहे. नव्याने प्राप्त झालेल्या गटर सफाई मशीनचे प्रात्यक्षिक आणि आरटीओ पासिंगची प्रक्रिया पूर्ण होताच ही सेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नगर परिषदेच्या अध्यक्षा देवश्री कापगते, मुख्याधिकारी मंगेश वासेकर तसेच सर्व नगरसेवकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गरजेनुसार या सेवांचा लाभ घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *