जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकºयांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात तुमसर व मोहाडी तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. राष्टÑवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बैठकीत शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी राज्य शासनाची कर्जमाफी योजना ही शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी विविध अटी-शर्तींमुळे लाखो शेतकºयांना लाभापासून वंचित ठेवणारी असल्याची टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार हे १२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असून, त्यांच्या आंदोलनाला भंडारा जिल्ह्यातून जाहीर पाठिंबा देण्यात आला. निवेदनात २०१९ च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकºयांसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांवर लादण्यात आलेली ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओटीएस) अट रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली.

प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांच्या अनुदानासाठी सलग चार वर्षे पीककर्ज फेडीची अट अन्यायकारक असल्याचे नमूद करून ती तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. २०१७ च्या कर्जमाफी योजनेत पात्र असूनही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या ६.५६ लाख शेतकºयांना लाभ देण्याबाबतही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, एक रुपयात पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी शेतकºयांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांपासून सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाला मिळणारे कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे सांगत, शासनाने कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी केली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *