
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात केलेल्या कारवाईत गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथून ९३४ ग्रॅम गांजा व मोबाईल असा एकूण १ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वाहतूक करणाºयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना भंडगा येथील एका महिलेकडे गांजाचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भंडगा येथील आरोपी महिला पुष्पा उर्फ मंगला मोतीराम मौजे (वय ५२) यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीत ९३४ ग्रॅम हिरवा ओलसर गांजा आढळून आला. दरम्यान, पथकाने ९३ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा व गांजाच्या व्यवहारासाठी वापरला जाणारा मोबाईल किमत १० हजार रुपये असा १ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने सदर गांजा गोंदिया येथील दोन व्यक्तींकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार गोरेगाव पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.