
गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरातील तुकडोजी पुतळा ते पोस्ट आॅफिस चौक मार्गावरील मुख्य रस्ता सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून अर्धवट रस्त्याचे काम आणि वाढते अतिक्रमण यामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील गांधी चौकातून जाणारा हा प्रमुख वर्दळीचा मार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक, व्यापारी तसेच लहान-मोठी वाहने या रस्त्याचा वापर करतात. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता अपघातांचे केंद्र बनत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र रस्त्याचा केवळ एक भाग तयार करून त्यावर डांबर टाकण्यात आले, तर उर्वरित अर्धा रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत पडून आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला उंची वाढली असून दुसरी बाजू खड्डेमय व उखडलेल्या स्थितीत असल्याने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून रस्त्यावरील चिखल, खड्डे आणि उंच-सखल भागांमुळे दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वाहनांचा तोल जाऊन किरकोळ अपघात घडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी आणि पावसाच्या सरींमध्ये हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. याशिवाय या मार्गावरील काही व्यापाºयांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. दुकानांसमोर ठेवलेला माल, फलक आणि इतर साहित्य यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनांना एकमेकांना मार्ग देताना मोठी अडचण निर्माण होते. शहरातील महत्त्वाच्या मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “अर्धवट सोडलेला हा रस्ता पूर्ण कधी होणार? या मार्गावरील अतिक्रमणावर कारवाई कधी होणार?”
नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा प्रशासनाला इतर बाबी महत्त्वाच्या वाटत आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. तुकडोजी पुतळा ते पोस्ट आॅफिस चौक या मार्गावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात घडणाºया अपघातांची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. “भंडारा शहरातील नागरिकांचा जीव इतका स्वस्त आहे का?” हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.