भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रामनगर परिसरात घरफोडी करून रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने व टॅबलेट चोरी करणाºया तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यात एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश आहे. दरम्यान, आरोपीं कडून तब्बल दोन लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी १० आॅगस्ट रोजी रामनगर-बालाघाट टी-प्वाइंटजवळ करण्यात आली. निखिल मेश्राम रा. यादव चौक, झोपडी मोहल्ला, गोंदिया व स्वप्नील उके रा. बहुजन चौक, कुंभारेनगर, गोंदिया असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. रामनगरच्या सूर्याटोला येथील रहिवासी विलास कवडू बोरकर (५०) यांच्या घरी ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान चोरी झाली होती. चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि एक टॅबलेट असा एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी विलास बोरकर यांनी सोमवारी १० आॅगस्टरोजी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निखिल मेश्राम, स्वप्नील उके आणि विधीसंघर्ष बालकाचा शोध घेतला. तिघेही रामनगर-बालाघाट टी- प्वाइंटजवळ दुचाकीवरून फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रामनगर हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून ७६ हजार रुपये रोख, एक टॅबलेट, सोने- चांदीचे दागिने, एक दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेले तीन अँड्रॉइड मोबाइल असा दोन लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.