भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जलसंधारण दिनानिमित्त माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी आयोजित ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉनला भंडारा वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दसरा मैदानापासून सुरू झालेल्या ३ किमी. च्या या महावॉकथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि जलसंधारणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे , नगराध्यक्ष मधुरा मदनकर,जयश्री बोरकर, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, जिल्हा जलसंधारण अधिकारी महेश सेलूकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद ठवकर यांनी केले. ‘माती वाचवा-पाणी वाचवा-सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशांनी परिसर दुमदुमला. सुरुवातीला जलसंरक्षणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर महावॉकथॉन ला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी देण्यात आली. यावेळी सर्व वयोगटातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे दिसले.मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमातून जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविण्याचा आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.