भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध गावाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. निसर्गरम्य वातावरण, वनसंपदा आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाºया नवेगाव बांधला आता ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सावंत यांच्या हस्ते नवेगाव बांध येथील ‘पुस्तकांच्या गावाचे’ उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हाधिकारी मंदार पत्की, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती. गावात वाचनाची संस्कृती रुजावी आणि ग्रामीण भागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडता यावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून नवेगाव बांध येथे वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना मोकळ्या वातावरणात पुस्तके वाचता यावीत, चर्चा करता यावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी अशा प्रकारचे आणखी नऊ वाचन कट्टे उभारण्यात येणार आहेत. राज्यातील निवडक गावांमध्ये ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून नवेगाव बांधला या उपक्रमासाठी निवडण्यात आले आहे. राज्यातील तिसरे आणि नागपूर विभागातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवेगाव बांधने मान मिळवला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही या गावाची नवी ओळख निर्माण झाली आहे. नवेगाव बांध परिसर आधीपासूनच निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे येणाºया पर्यटकांना निसर्गाचा अनुभव घेण्यासोबतच आता साहित्य आणि वाचन संस्कृतीचीही अनुभूती घेता येणार आहे.
पर्यटन आणि वाचन संस्कृती यांची सांगड घालणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमामुळे गावातील मुलांना आणि नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध होतील. वाचनाची आवड निर्माण होण्यासोबतच ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार आहे. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या काळात पुस्तकांकडे पुन्हा वळविण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आता पुस्तकांचीही साथ… पर्यटनाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केलेल्या नवेगाव बांधने आता वाचन संस्कृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून मिळालेली ही ओळख गोंदिया जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ठरणार आहे.