भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- खेळता-खेळता वडिलांच्या खिशातून खाली पडलेले एक रुपयाचे नाणे अडीच वर्षांच्या चिमुकल्याने गिळल्याची घटना गोंदियातील सिंगलटोली परिसरात घडली. नाणे घशात अडकल्याने चिमुकल्याला त्रास होऊन उलट्या सुरू झाल्या. मात्र, कुटुंबीयांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून नाणे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि चिमुकल्यालाजीवदान मिळाले. सिंगलटोली निवासी शान सौरभ नंदेश्वर हा अडीच वर्षांचा चिमुकला १९ आॅगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरात खेळत होता. यावेळी त्याच्या वडिलांच्या खिशातून एक रुपयाचे नाणे खाली पडले. खेळताना चिमुकल्याने ते नाणे तोंडात घातले आणि ते अचानक गिळले. नाणे घशात अडकल्याने त्याला त्रास होऊ लागला तसेच उलट्याही सुरू झाल्या. घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने चिमुकला केटीएस रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी करून एक्स-रेकाढला असता चिमुकल्याच्या घशात नाणे अडकल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचेगांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. दरम्यान , या घटनेची माहिती समाजसेवक नागो बंसोड यांना मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांच्याशी संपर्क साधला. नानू मुदलियार यांनी तत्काळ केटीएस रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाचे इन्चार्ज गणेश बिसेन यांच्यासह डॉक्टरांची संपूर्ण टीम उपचारासाठी सज्ज झाली. डॉक्टरांनी रात्रीउशिरापर्यंत अथक प्रयत्न करत अखेर रात्री एक वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याच्या घशातून अडकलेले नाणे सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर शानला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. दुसºया दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. डॉक्टरांची तत्परता, समाजसेवक नागो बंसोड आणि नानू मुदलियार यांच्या मदतीमुळे वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. चिमुकल्याच्या पालकांनी डॉक्टरांसह मदत करणाºया सर्वांचे मनापासून आभार मानले.