नवेगावबांध येथे नौकाविहाराची नवी पहाट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील निसर्गसंपन्न नवेगावबांध परिसराने बुधवारी, ८ एप्रिल २०२६ रोजी एका नव्या पवार्ची सुरुवात अनुभवली. नवेगावबांध येथील जलाशयावर नौकाविहार (बोटिंग) सुविधेचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले तसेच राजेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी जलाशयाच्या शांत, निळ्याशार पाण्यावरून नौका संथपणे झुलताना पाहणे, हा अनुभव आता गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांसाठी वास्तव ठरणार आहे. एस . के. इन्फ्रा गोंदिया यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची बोटिंग सुविधा सुरू करण्यात आली असून, ही केवळ एक सेवा नसून पर्यटनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे.

नवेगावबांध परिसरातील हिरवाईने नटलेले डोंगर, जलाशयाचे अथांग पाणी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरलेले वातावरण या सर्वांच्या संगमातून पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. या नौकाविहारामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्याची सुवर्णसंधी लाभणार असून, गोंदिया जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर नवेगावबांध अधिक ठळकपणे उमटणार आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार प्रफुल पटेल यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ह्लपर्यटन हा विकासाचा महत्त्वाचा पाया ठरू शकतो. नवेगावबांध येथे सुरू झालेली ही बोटिंग सुविधा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या दाराही उघडेल,ह्व असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यातून विकास आणि निसर्गसंवर्धन यांचा समतोल राखण्याचा संदेश स्पष्टपणे उमटला. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. नौकाचालक, मार्गदर्शक, तांत्रिक सहाय्यक, तसेच पर्यटनाशी निगडित इतर सेवा क्षेत्रांमध्ये अनेक युवकांना संधी उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शुभारंभ सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. लायकराम भेंडारकर, देवेंद्रनाथ चौबे, चंद्रपाल चौकसे, आम्रपाली डोंगरवार, रचनाताई गहाणे, गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार, केवलराम पुस्तोडे, संदीप कापगते, प्रमोद लांजेवार, शैलेश जायस्वाल, नामदेव डोंगरवार, दादाजी फुंडे, नितीन पुगलिया, होमराज पुस्तोडे, पुष्पलताताई द्रुगकर, अनिरुद्ध कांबळे, समीर बनसोडे, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, सुनील तरोणे, राकेश लंजे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पर्यटनप्रेमी या सोहळ्यास उपस्थित होते. नवेगावबांधातील या नौकाविहाराच्या माध्यमातून गोंदिया जिल्हा पर्यटनाच्या नव्या उंचीवर झेपावेल, अशी आशा व्यक्त होत आहे. निसर्गाच्या कुशीत विसावलेला हा जलाशय आता केवळ शांततेचा नव्हे, तर उत्साह आणि संधींचा साक्षीदार ठरणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *