अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

३० ते ३५ जणांना दंश; ११ जण रुग्णालयात दाखल, एकाची प्रकृती चिंताजनक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

गोंदिया : गोंदिया तालुक्यातील जब्बरटोला येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विधी सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अस्थी विसर्जनासाठी जब्बरटोला परिसरात सुमारे ३० ते ३५ नागरिक गेले होते. अस्थी विसर्जनाची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला आणि मधमाशांनी उपस्थित नागरिकांवर हल्ला चढवला. मधमाशांच्या मोठ्या थव्याने केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मिळेल त्या दिशेने धाव घेतली. या घटनेत ३० ते ३५ जणांना मधमाशांनी दंश केल्याची माहिती आहे. या घटनेतील जखमींपैकी ११ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यातील आठ जणांवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC), तर तीन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली असून, त्याला अतिदक्षता कक्षात (ICU) दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. अचानक झालेल्या या मधमाशांच्या हल्ल्यामुळे जब्बरटोला परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अस्थी विसर्जनासाठी आलेल्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *