■ सिल्ली येथील आरोग्य उपकेंद्रातील प्रकार
■ संगणकीय कामांसह आरोग्य सेवा प्रभावित
भंडारा पत्रिका/वार्ताहर
सिल्ली : शासनाकडून मिळणाऱ्या ‘अबंधित निधी’ (अंटाईड फंड) च्या अभावामुळे खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सिल्ली येथील आरोग्य उपकेंद्रांचे वीज बिल थकले. त्यामुळे ऑटोमॅटिक वीजपुरवठा खंडीत झाला असून दि. २५ सप्टेंबरपासून आरोग्य कर्मचाऱ्यांवर अंधारात काम करण्याची पाळी आली असून संगणकीय नोंदी आणि इतर ऑनलाइन कामे ठप्प झाली आहेत.
तालुक्यातील खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खमारी, कोका, कारधा, माटोरा आणि सिल्ली अशी पाच उपकेंद्रे येतात, यापैकी कोका केंद्राची आधीच वीज खंडीत झाली असून सिल्ली उपकेंद्रांची दि. २५ सप्टेंबरला वीज जोडणी खंडित करण्यात आली असून कारधा केंद्रावरही विजेची टांगती तलवार आहे.
स्मार्ट मीटरचा फटका
सिल्ली येथील उपकेंद्रांचे सुमारे २-३ महिन्यांचे बिल थकीत आहे. नवीन स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल वेळेत न भरल्यास आपोआप वीज कनेक्शन खंडित झाले. त्यामुळे कार्यालयात अंधार असून दिवसभर गर्मीत काम करणे अवघड झाले असून वीज नसल्याने संगणक बंद पडले. ऑनलाइन नोंदी, डेटा एंट्री आणि झेरॉक्सची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मोबाईलवर किंवा बाहेर जाऊन कामे उरकावी लागत आहेत.
अबंधित निधी बंद झाला
पूर्वी उपकेंद्रांना वर्षाला ४० ते ४५ हजार रुपयांचा अबंधित निधी (अंटाईड फंड) मिळत होता, ज्यातून विजेचे बिल व इतर स्थानिक खर्च भागविले जात होते. मात्र मागील वर्षापासून शासनाने हा निधी पद्धत बंद करून थेट व्हेंडर पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे. या नवीन प्रणालीतून निधी जमा होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करण्याची वेळ आली आहे.
शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन या उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.