भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गोंदियात भाजप कार्यकर्त्यांचा संताप रस्त्यावर उतरला. पंतप्रधानांविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात जोरदार आंदोलन केले. यावेळी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा क्षेत्रातील भाजप आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जयस्तंभ चौकात एकत्र आले. हातात घोषणांचे फलक आणि मनात संताप व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेतृत्वाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाहता पाहता संपूर्ण जयस्तंभ चौक निषेधाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याला पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे सांगत तीव्र निषेध नोंदविला संतप्त कार्यकर्त्यांनी चौकात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी हाय-हाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.