भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत (रेशन) लाभार्थ्यांना मिळणाºया धान्याबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रेशन दुकानांमधून गव्हाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि खाण्यास अयोग्य असलेला मका वितरित केला जात आहे. हा मका मानवी वापरासाठी पूर्णपणे अनुपयुक्त असल्यामुळे लाभार्थ्यांना तो जनावरांना भरवण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भंडारा हा प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा असून येथील नागरिकांच्या आहारात गहू आणि तांदळाला प्राधान्य असते. स्थानिक आहाराशी जुळवून न घेणारा व हलक्या प्रतीचा मका नागरिकांवर लादण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हा मका दळण्यासाठी स्थानिक गिरणी चालक प्रति किलो १५ ते २० रुपये दर आकारत आहेत. त्यामुळे शासनाच्या ‘मोफत धान्य योजने’चा लाभ मिळण्याऐवजी हातावर पोट असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांवर नाहक आर्थिक ताण पडत असून उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत तुमसर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे. रेशन दुकानांमधून होणारे निकृष्ट मक्याचे वितरण तत्काळप्रभावाने बंद करून त्याऐवजी पूर्वीप्रमाणे नियमित गहू किंवा ज्वारीसारखे सकस धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर आणि कंत्राटदारांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण, पराग व्यवहारे, विनोद ठाकरे, प्रविण बानासुरे उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल न घेतल्यास, तुमसर तालुक्यातील सर्व रेशन लाभार्थी व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी तसेच भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांना सादर करण्यात आली आहे.