नगर पालिकेतील खोट्या सह्या व नोकरी प्रकरणाची चौकशी करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगर परिषद कार्यालयातील बोगस संमतीपत्रे, खोट्या सह्या आणि गैरकारभाराविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी माजी सफाई कामगार सनी राजेश पांडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे. परंतु, चार दिवस लोटूनही नगर परिषदेचे अध्यक्ष, मुख्याधिकारी किंवा संबंधित प्रशासकीय अधिकाºयांनी आंदोलनाची दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सनी राजेश पांडे यांनी नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. सुनील मेश्राम (माजी आस्थापना लिपिक) आणि सुशिल रामकृष्ण मोटघरे यांनी संगनमत करून, कोणतीही पूर्वपरवानगी किंवा संमती न घेता, अर्जदाराच्या नावाने खोट्या सह्या आणि बोगस संमतीपत्र तयार केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून अनधिकृतपणे नोकरी हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणातील सत्यता समोर आणताना, सदर संमतीपत्रावर साक्षीदार म्हणून नाव असलेल्या सुबोध परदेशी शेंडे यांनीसुद्धा नगर परिषद तुमसर व तहसीलदार कार्यालयासमक्ष लिखित बयान दिले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्या पत्रावर असलेल्या सह्या त्यांच्या नसून ते अर्जदारालाओळखतही नाहीत; तसेच त्यांच्या नावाने खोटे आधार कार्ड व सहीचा गैरवापर करण्यात आला आहे.

धमकी आणि दबावतंत्राचे आरोप

पदावर असताना सुनील मेश्राम यांनी सनी पांडे यांना हाताशी धरून हरीश राजेश पांडे यास नोकरीवर संमती देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. २०११ पासून करारनामा (अग्रीमेंट) देण्याचे आमिष दाखवूनही अर्जदाराने नकार दिल्यानंतर, कार्यालयीन वेळेत (सकाळी ९:०० वाजता) कुमार रगडे यांच्यामार्फत परस्पर पत्र पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, त्या पत्रावर कोणत्याही मुख्याधिकारी महोदयांची स्वाक्षरी नसतानाही गंभीर प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. या संपूर्ण प्रकरणामागे सुनील मेश्राम यांचा हात असून, २०२३ ते २०२६ दरम्यान अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने कोणतीही कायदेशीर कारवाईकेलेली नाही.

प्रशासनाकडून दुर्लक्ष; तीव्र आंदोलनाचा इशारा

या गंभीर गैरप्रकाराची आणि सुनील मेश्राम यांच्या आस्थापना विभागातील मनमानी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीसाठी सनी पांडे यांनी सोमवारपासून नगर परिषदेसमोर आमरण उपोषण आरंभले आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस असूनही स्थानिक प्रशासनाने साधी भेट देऊन विचारपूस करण्याची तसदी घेतलेली नाही. प्रशासनाच्या या अवेदनशीलता व दुर्लक्षित भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांनी तीव्र पवित्रा घेतला असून, यापुढे ‘पाणी बंद’ करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

 

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *