भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील कारधा-भंडारा येथील वैनगंगा नदीवरील पुलावरील बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत, पुलासह महामार्गावरील खड्डयांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्यांसाठी नॅशनल अट्रोसिटी प्रिव्हेन्शन फोर्स (एनएपीएफ), भंडारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत संबंधित प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. कारधा-भंडारा येथील वैनगंगा नदीवरील पूल हा जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने आणि प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना पुलावरील अनेक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलावर अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असून वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेण्यात अडचणी येत आहेत. परिणामी अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
