भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील हनुमान नगर परिसरात दलितोत्तर निधीअंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्ता व नाली बांधकामात अत्यंत गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जा समोर आला आहे. या प्रकरणी वारंवार लेखी तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ‘स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन’च्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा, विभागीय आयुक्त नागपूर आणि मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण (नगरपरिषद तुमसर) यांना स्मरणपत्र पाठवून तीव्र आंदोलनाचा अंतिम इशारा देण्यात आला आहे. हनुमान नगरमधील या सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे कंत्राट गोंदिया येथील मे. सर्वेश कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे सिमेंट व साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, रस्ता झाल्यानंतर त्यावर क्युरिंग(मजबुतीसाठी पाणी मारणे) देखील करण्यात आले नाही. यामुळे कडक उन्हामुळे व वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील सिमेंटची धूळ उडून थेट परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये आणि खाद्यान्नावर जात आहे. परिणामी, लहान मुले, वृद्ध व नागरिक यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
