भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांमुळे या प्रयत्नांना बळ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या ‘गुड अँड ग्रीन’ उपक्रमांतर्गत राज्यात सार्वजनिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, बांधकाम कामगार कल्याण, कृषी विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढील तीन वर्षांत २५ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोदरेज समूहाचा महाराष्ट्राशी १२० वर्षांहून अधिक काळाचा संबंध असून, राज्यातील विविध सामाजिक विकास उपक्रमांमध्ये समूह योगदान देत आहे. राज्यात मलेरिया निर्मूलन आणि डेंग्यू नियंत्रणासाठी आतापर्यंत १६ हजार गावे आणि ९ हजार झोपडपट्ट्यांमध्ये उपक्रम राबविण्यात आले आहेत. २०३० पर्यंत महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकाम कामगारांसाठी राबविलेल्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ९० हजार कामगारांची नोंदणी झाली असून, १८० कोटी रुपयांहून अधिक शासकीयनिधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
