वांगीतील दारू दुकानामुळे विद्यार्थिनींची कुचंबणा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील वांगी येथील गोंड- उमरी मार्गावर सुरू असलेल्या देशी दारू दुकानामुळे शाळा-महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: विद्यार्थिनींना दुकानासमोरून ये-जा करताना संकोच आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. वांगी हे परिसरातील प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. बोडदे, चिंगी यासह आसपासच्या गावांतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गोंड- उमरी व परिसरातील शाळा-महाविद्यालयांत जातात. या विद्यार्थ्यांना दररोज वांगी येथील मुख्य रस्त्यानेच प्रवास करावा लागतो. मात्र, याच रस्त्यावर देशी दारूचे दुकान असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दारू दुकानासमोर दिवसभर मद्यपींची गर्दी आणि वर्दळ असते. त्यामुळे शाळेत जाणाºया लहान मुलांसह विशेषत: मुलींना या मार्गावरून जाताना अडचणींचा सामना करावा लागतो. किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मनावरही अशा वातावरणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार लक्ष वेधूनही परिस्थितीत बदल झालेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, सार्वजनिक शांतता आणि शैक्षणिक वातावरण यांचा विचार करून संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. संग्रहित छाया

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *