भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीक नियोजन करावे. धान पिकाच्या मागे न लागता कमी पाण्यात येणारी मोहरी, हरभरा, मसूर, जवस यांसारखी पिके घेण्यास शेतकºयांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले. जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई, चारा टंचाई तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी टंचाई कालावधीत राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा घेतला.
आॅगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धान पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. पावसातील तूट आणि पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करून पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. शेतकºयांनी आगामी हंगामासाठी आतापासूनच नियोजन करावे. ज्या भागात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आहे, तेथे पाण्याचा काटकसरीने वापर करावा. ज्या शेतकºयांकडे सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही, त्यांना पर्यायी पिकांबाबत मार्गदर्शन करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार पाण्याची उपलब्धता आणि पाणी बचतीचा सविस्तर आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पाणीटंचाई असलेल्या भागात पिकांच्या सिंचनासाठी नियमावली तयार करून पाण्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करावा. तहसीलदार आणि ग्रामसेवकांनी गावोगावी जाऊन शेतकºयांसोबत बैठका घ्याव्यात. पाणीटंचाईची वस्तुस्थिती समजावून सांगून आगामी हंगामातील पिकांचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.
कृषी विभागामार्फत कमी पाण्यात येणाºया पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मागील हंगामात २ हजार २१५ शेतकºयांना प्रति शेतकरी एक एकर या प्रमाणात २ हजार २१५ क्विंटल मोहरीच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले होते. तसेच हरभरा, मसूर व मोहरीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून काही प्रमाणात ज्वारीच्या बियाण्याचेही वाटप करण्यात आले आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना आणि शेतकºयांना आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नळ दुरुस्तीची कामे आणि नवीन विहीर अधिग्रहणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय विशेष दुरुस्तीची कामे आणि पूरक नळ योजनांची कामे प्रस्तावित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शेतकºयांच्या अडचणींचा आढावा घेऊन अनुदान व अन्य योजनांबाबत आवश्यक कार्यवाही करावी आणि तालुकास्तरीय समितीने यासंदर्भात अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी हितेश खोब्रागडे, कृषी अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
