भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदोरा येथील स्मशानभूमी सभामंडप परिसरात सुरू असलेल्या ५२ तासपट्टीच्या पैशाच्या हारजितीच्या जुगारावर जवाहरनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रकमेसह दुचाकी असा एकूण ५ लाख ६५ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक दुधकावर हे पोलीस स्टेशन परिसरात असताना त्यांना नांदोरा येथील स्मशानभूमी सभामंडपात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता काही इसम ५२ तासपट्टीचा पैशाचा हारजितीचा जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत रविंद्र मारोती बारसागडे (४८), कुंदन संजय पंचबुद्धे (२१), महेश गणेश मेश्राम (३४), अविनाश सुरेश गायधने (३४), धनराज सुखराम गजभिये (५४), हिमांशू राजेश शेंडे (२५), मयंक विनोद शेंडे (१८), रोहित ऊर्फ आशु पृथ्वीराज गजभिये (२३), निलेश ऊर्फ लाला अशोक सपाटे (३४), अभिषेक शिवचरण बनसोड (३०) आणि चेतन भिक्षुक पिकलमुंडे (२७), सर्व रा. नांदोरा, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून फळावरची नगदी ७०० रुपये, ५२ तासपट्टीची पाने, आरोपींच्या अंगझडतीतून ८ हजार १८० रुपये रोख, आठ दुचाकी व अन्य मुद्देमाल असा एकूण ५ लाख ६५ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अपराध क्रमांक ४७४/ २०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुधकावर, पोलीस हवालदार दोनोडे व जवाहरनगर पोलीस पथकाने केली. पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.
