डुग्गीपार पोलिसांच्या तत्परतेने हरवलेली सोन्याची चैन मिळाली परत!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : हैदराबाद येथून रायपूरकडे जाणाºया खासगी ट्रॅव्हल्समधील एका प्रवाशाची मनी पर्स हरवल्याची घटना घडली. मात्र, डुग्गीपार पोलिसांनी तत्परता दाखवत बसमध्ये शोधमोहीम राबवून हरवलेली सोन्याची चैन शोधून प्रवाशाला परत केली. प्राप्त माहितीनुसार, खासगी प्रवासी बस क्रमांक सीजी ०८ डीडी ९०९९ ही हैदराबादहून रायपूरकडे जात असताना डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी येथील रोडलगत असलेल्या बल धाब्यावर चहा- नाश्त्यासाठी थांबली होती. यावेळी प्रवासी आईस सूर्यनारायण यांची मनी पर्स हरवल्याचे लक्षात आले.

पर्समध्ये सोन्याची चैन असल्याचे त्यांनी बस चालकाला सांगितले. त्यानंतर चालकाने बस प्रवाशांसह डुग्गीपार पोलीस ठाण्यात आणून उभी केली. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश कुलमते यांनी पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार रमेश वाढीवे, हवालदार योगेश कुलमते, महिला हवालदार प्रमिला ताराम व महिला शिपाई सुषमा कनपूरीया यांनी तातडीने बसमध्ये शोध घेतला. यावेळी एका ठिकाणी रिकामी पर्स आढळली. पोलिसांनी अधिक तपासणी केली असता एका सीटखाली सोन्याची चैन मिळून आली. पोलिसांनी सदर सोन्याची चैन प्रवासी आईस सूर्यनारायण यांना परत केली. हरवलेली चैन सुरक्षित परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे सांगितले. यानंतर डुग्गीपार पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद करून बसला पुढील प्रवासासाठी रवाना केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *