भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्य महामार्गालगत असलेल्या संवेदनशील दावेझरी-मिटेवाणी शिवारात मुरूम माफियांचा सुळसुळाट वाढला असून, शासकीय व सणासुदीच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत जेसीबीच्या साहाय्याने येथील महाकाय नैसर्गिक टेकड्या अक्षरश: मुळापासून पोखरल्या जात आहेत. मागील सुमारे दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या अनागोंदी कारभारामुळे परिसरातील जैवविविधतेचे अतोनात नुकसान झाले असून, पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे; मात्र या गंभीर प्रकरणाकडे स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्यव्यक्त होत आहे.
