पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; हल्ल्यात मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत असताना घरात शिरलेल्या बिबट्याने पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उचलून नेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास तिर्री येथे ही हृदयद्रावक घटना घडली. अद्विक अभिमन बोंदरे (वय ६ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तिर्री येथील रहिवासी अभिमन बोंदरे यांना दोन मुली असून अद्विक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारी सायंकाळी अद्विकची आई घरातील स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होती, तर सहा महिन्यांचा अद्विक घरात पाळण्यात झोपला होता. याचवेळी अचानक बिबट्याने घरात प्रवेश करून पाळण्यात झोपलेल्या अद्विकला उचलून नेले. हा प्रकार लक्षात येताच आईने आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. आपल्या डोळ्यांदेखत चिमुकल्यावरझालेल्या हल्ल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचेही मन हेलावून गेले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आठवडाभरात दुसºया बालकाचा बळी

अड्याळ परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत आहेत. लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे ५ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच तिर्री येथे सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूझाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडणाºया या घटनांमुळे वनविभागाच्या सुरक्षा उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वनविभागाच्या उपाययोजनांसाठी ग्रामस्थ आक्रमक

तिर्री येथील घटनेनंतर जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. लहान मुले, महिला, शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांना सुरक्षितपणे वावरता यावे, यासाठी वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.परिसरात वनविभागाची नियमित गस्त वाढविणे, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारणे, गावांमध्ये जनजागृती करणे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. तसेच मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. आठवडाभरात दोन चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने वनविभागाने आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *