भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील गावतलावात सकाळी ९:३० च्या दरम्यान वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दगाबाई मनिराम आकरे, वय ७६ वर्षे, रा. सिल्ली असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्या घरातून निघून गेल्या होत्या. सकाळी शोधाशोध केली असता दि. १३ नोव्हेंबर रोजी तलावाच्या पाळीवर त्यांची चप्पल आणि काठी दिसली, तर त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. याची खबर कारधा पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मर्ग दाखल करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला आहे.
फिर्यादी रामरतन जानबाजी आकरे, वय ५५ वर्षे, रा. सिल्ली, ता. जि. भंडारा यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार, मृतक दगाबाई मनिराम आकरे, वय ७६ वर्षे, रा. सिल्ली यांना वाताचा व पोटदुखीचा त्रास होता. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्या गावात कुठेही फिरत होत्या. दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता मौजा सिल्ली गावतलाव (गावापासून ५ किमी दक्षिण) येथे आजारपणाला कंटाळून त्यांनी तलावाच्या पाण्यात उडी घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात दि. १३/११/२०२६ रोजी १२.४० वाजता पोहवा छाया मेश्राम यांनी मर्ग दाखल केला असून मरणाचे कारण – तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू असे नमूद आहे. पुढील तपास पोहवा संदीप केंद्रे, ब.नं. १२१४, पो.स्टे. कारधा हे करीत आहेत.
