भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाचा घरीच मृत्यू झाल्याचे आढळले, तर दोघांचा अपघात व विषप्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका महिलेचा दुचाकी अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सर्व प्रकरणांत संबंधित पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद केली आहे.
घरीच आढळला मृतावस्थेत : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा घरीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संबंधित व्यक्ती घरी एकटीच राहत होती. झोपेतून उठत नसल्याने व कोणतीही हालचाल करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी मर्ग नोंदविला आहे.
दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेबाम्हणी गावाच्या वळणावर २७ आॅक्टोबर रोजी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात विलास दिलीप कोल्हाटकर (वय ३२, रा. श्रीरामनगर, महादुला, नागपूर) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २९ आॅक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तुमसर पोलिसांनी मर्ग नोंदविला.
विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू : साकोली तालुक्यातील लवारी येथील सचिन लेसमन लांजेवार (वय ३२) याने २७ ते २८ आॅक्टोबरदरम्यान विषारी औषध प्राशन केले होते. त्याला प्रथम सेंदूरवाफा येथील रुग्णालयात व त्यानंतर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ३ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकोली पोलिसांत मर्ग नोंद करण्यात आली आहे.
म्हशीच्या धडकेत महिलेचा मृत्यू : साकोली उड्डाणपुलावर १२ आॅक्टोबर रोजी रस्त्यावर पडलेल्या म्हशीला दुचाकीची धडक बसल्याने अनिता सोमनाथ शाहू (वय २८) ही महिला खाली पडून गंभीर जखमी झाली होती. पतीसोबत कुटुंबीयांसह नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला. तिच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी साकोली व त्यानंतर नागपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, १७ आॅक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी मर्ग नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
