वैनगंगेच्या जुन्या पुलावरुन अवघ्या सहा इंचावर पाणी असतानाही ‘जीवघेणा प्रवास सुरुच’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कारधा येथील वैनगंगा नदीवरील सुमारे दीडशे वर्षे जुना पूल सध्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी पुलाच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचले असून अवघ्या सहा इंचांवर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना कोणतेही संरक्षण कठडे नसताना आणि पुलाच्या पृष्ठभागावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडलेले असतानाही दुचाकीस्वार व पादचारी जीव मुठीत धरून या पुलावरून जीवघेणा प्रवास करीत आहेत.

विशेष म्हणजे, मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असतानाही दुचाकी व पादचाºयांची ये-जा सुरू असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे या जुन्या पुलाची परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे. पुलावरून जाताना दोन्ही बाजूंना अथांग पाणी आणि मधोमध अरुंद रस्ता असेभयावह चित्र दिसते. पुलाच्या पृष्ठभागावरील डांबर उखडल्याने मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यामध्ये नदीचे पाणी उसळताना दिसत आहे. अशा परिस्थितीत दुचाकीचा तोल गेला किंवा चाक या खड्डयात अडकले तर वाहनचालक थेट नदीच्या प्रवाहात फेकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघात झाल्यास जीव वाचविण्याची संधीही मिळणे कठीण आहे.

जलपर्णीचा पुलाला विळखा; पुलाचा अंदाज येणे कठीण

वैनगंगा नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात इकॉर्निया अर्थात जलपर्णी वनस्पती पसरली आहे. या जलपर्णीने जुन्या पुलालाही विळखा घातला असून तिची हिरवीगार पाने पुलाच्या पृष्ठभागालगत पसरलेली दिसत आहेत. त्यामुळे पाणी आणि पुलाचा पृष्ठभाग यातील सीमारेषा स्पष्टपणे लक्षात येत नाही. पुराच्या पाण्यासोबत जलपर्णीचा विस्तार झाल्याने पुलाची प्रत्यक्ष रुंदी आणि सुरक्षितमार्गाचा अंदाज घेणेही कठीण झाले आहे. विशेषत: अपरिचित वाहनचालकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.

 

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *