भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नवेगावबांध जंगलात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेºयांची तपासणी करत असताना चार अस्वलांनी वनरक्ष कावर अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना अर्जुनीमोरगाव तालुक्यातील बुटाई क्रमांक २ परिसरातील कक्ष क्रमांक ३१८ मध्ये घडली. बुधवारी सकाळी अंदाजे ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वनरक्षक सतीश शेदरे गंभीर जखमी झाले. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वनरक्षक सतीश शेदरे हे नेहमीप्रमाणे जंगलात गस्तीवर गेले होते.
दरम्यान, कक्ष क्रमांक ३१८ मध्ये वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेºयांची तपासणी करीत असताना अचानक चार अस्वल त्यांच्या समोर आल्या. काही समजण्यापूर्वीच अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. या अस्वलांच्या कळपात एक नर, एक मादी आणि दोन बछड्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. अस्वलांच्या या अचानक झालेल्या हल्ल्यात शेदरे यांच्या हाताला आणि मांडीला दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
