भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ५७६ शेतकऱ्यांची दोन लाखांवरील कर्जासाठी ओटीएस योजनांची यादी प्राप्त : सुनिल फुंडे

 

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पात्र कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता (ओटीएस) योजनेची मानक कार्यप्रणाली (एसओपी) शासनाने जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५७६ शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे। पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला हिस्सा भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले आहे।

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पात्र कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचा हिस्सा भरावा लागणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे।

सहकार आयुक्त तथा सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाने १९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीत कर्जाची थकबाकी, कपातीनंतरची रक्कम, शेतकऱ्याचा हिस्सा आणि शासनाकडून मिळणारा लाभ याचा सविस्तर तपशील नमूद असेल। उदाहरणार्थ, पात्र कर्ज २.५० लाख रुपये असल्यास शेतकऱ्याला ५० हजार रुपये स्वतःचा हिस्सा भरावा लागेल। एकाच शेतकऱ्याची एकापेक्षा अधिक कर्ज खाती असल्यास कोणत्याही एका खात्यात रक्कम जमा करता येईल। शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची नोंद बँकांनी दर शुक्रवारी महा आय टी पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक असून, त्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल। शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य असून, त्यानंतर शासनाचा मंजूर लाभ कर्जखात्यात जमा होईल।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *