भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गावपातळीवर शासन आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस पाटलांना निवृत्तीनंतर कोणताही आर्थिक लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. उतारवयात सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी सेवानिवृत्त पोलीस पाटलांना किमान १० हजार रुपये मासिक पेन्शन मंजूर करावी, यासह विविध मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
पोलीस पाटील हे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शासनाच्या विविध योजना आणि प्रशासनाचे निर्णय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. अनेक पोलीस पाटील ३० ते ३२ वर्षे मानधनावर प्रामाणिकपणे सेवा बजावतात. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हातात कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही. एवढेच नव्हे, तर सेवानिवृत्तीचे प्रमाणपत्रदेखील दिले जात नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
एकीकडे मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून निवृत्तीनंतर आर्थिक तरतूद केली जाते, तसेच विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, आयुष्याची महत्त्वाची वर्षे गावाच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या पोलीस पाटलांना निवृत्तीनंतर कोणताही आर्थिक आधार मिळत नाही. ही बाब अन्यायकारक असून शासनाने त्यांच्या योगदानाचा विचार करून पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही एका वेगळ्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर पेन्शन नाकारता येत नसल्याचे निरीक्षण नोंदविल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
सेवानिवृत्त पोलीस पाटलांना किमान १० हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावी, त्यांच्या वारसांना त्यांच्या जागेवर सेवेत सामावून घ्यावे, सेवानिवृत्तीनंतर सन्मानपूर्वक सेवा प्रमाणपत्र द्यावे, तसेच इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. येत्या ७ डिसेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तो जाहीर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महसूल मंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिंराज उके, तालुका सचिव गजानन पाचे, विलास केजरकर, जिल्हा कौन्सिल सदस्य भगवान मेश्राम, सेवानिवृत्त पोलीस पाटील प्रतिनिधी श्रीराम भिवगडे, शिवशंकर बंजारी, मदन मते, दसराम गाढवे, रामभाऊ मिरासे, वासुदेव ठाकरे, येलिचंद मडामे, अरुण मेश्राम, प्रतिम चव्हाण, मधुकर बाते, बाबुराव भोतमणगे आदी उपस्थित होते.
