कृषी ग्राहकांना १२ तास अखंडित वीजपुरवठ्यासाठी शासन व महावितरण कटिबद्ध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ३३/११ केव्ही डोरली भिंगारे उपकेंद्राचे लोकार्पण महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. याच वेळी येनीकोनी येथे प्रस्तावित ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कृषी ग्राहक, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळून परिसराच्या विकासाची नवी पहाट उगवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी ग्राहकांना १२ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि महावितरण पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. डोरली भिंगारे येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम अवघ्या एका वर्षांत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाचे मनापासून अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले असून, कमी दाबाने वीजपुरवठा होणे आणि वारंवार वीज खंडित होणे यांसारख्या समस्यांतून ग्राहकांची सुटका करण्यावर भर दिला जात आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेती व सिंचनासाठी अखंडित विजेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

काटोल-नरखेडचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी डोरली भिंगारे उपकेंद्राचे लोकार्पण आणि येनीकोनी उपकेंद्राचे भूमिपूजन हे मतदारसंघाच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्यासोबतच संपूर्ण देशाचीही विकासाच्या दिशेने वेगवान वाटचाल सुरू असून, मजबूत पायाभूत सुविधांमुळे ग्रामीण प्रगतीला नवे बळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी व नागरिकांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांनी येनीकोनी येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रकल्पांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले.

प्रादेशिक संचालक (प्रभारी), नागपूर परिक्षेत्र तथा मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट समन्वय व कार्यक्षमतेतून लोकहिताची उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन, महावितरण आणि कॅपिटल एजन्सी यांच्या समन्वयामुळे कामांना गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

डोरली भिंगारे उपकेंद्राचे काम अवघ्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) दिपाली मांडेलवार, काटोल विभाग कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे व कार्यकारी अभियंता (स्थापत्य) जयंत खिरकर यांच्यासह उपविभागीय, वितरण केंद्र स्तरावरील अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने हे कार्य यशस्वी झाले.

या प्रकल्पांमुळे परिसरातील वीजपुरवठ्याची क्षमता व गुणवत्ता सुधारून कमी दाब आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल. येनीकोनी उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर तेथील घरगुती, व्यावसायिक आणि कृषी ग्राहकांना दर्जेदार व स्थिर वीजपुरवठा मिळेल. या सोहळ्याला आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे, मनोहर कुंभारे यांच्यासह विविध पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित पेंदेकर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *