ड्रममध्ये शिल्लक असलेल्या गॅसच्या संपर्कात कटरची ठिणगी आल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शिवनगर येथे वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम सुरू असताना झालेल्या भीषण स्फोटात वर्कशॉप चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश रहांगडाले (वय ३६) असे मृतकाचे नाव आहे. लोखंडी ड्रम कटर मशिनच्या साहाय्याने कापत असताना अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा संपूर्ण थरार वर्कशॉपमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश रहांगडाले हे शिवनगर परिसरात स्वतःचे वेल्डिंग वर्कशॉप चालवत होते. काल सायंकाळी ते आपल्या वर्कशॉपमध्ये लोखंडी ड्रमचा वरचा भाग कटर मशिनच्या साहाय्याने कापण्याचे काम करीत होते.
याचवेळी अचानक ड्रममध्ये जोरदार स्फोट झाला. प्राथमिक अंदाजानुसार, ड्रममध्ये पूर्वी साठवलेल्या गॅसचा काही अंश शिल्लक होता. ड्रम कापताना कटर मशिनमधून निघालेली ठिणगी या गॅसच्या संपर्कात आल्याने हा भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, योगेश रहांगडाले गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने गोंदियातील युनायटेड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वर्कशॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या भीषण स्फोटाचा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. एका छोट्याशा ठिणगीमुळे घडलेल्या या भीषण दुर्घटनेत वर्कशॉप चालकाला आपला जीव गमवावा लागल्याने शिवनगर परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने जुन्या ड्रममधील गॅसचे अवशेष तपासल्याशिवाय ते कापण्याचे काम करणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
