मुंडीपार/सडक येथे शेळीवर हल्ला करणारा प्राणी नेमका वाघ की बिबट्या?

◆ वन विभागाचा दावा बिबट्याचा, तर प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ ठामपणे म्हणतात वाघच! दोन बछड्यांसह वावर असल्याची माहिती; परिसरात प्रचंड दहशत◆ ८ नोव्हेंबरच्या विशाल उईकेच्या मृत्यूची घटना ताजी असताना पुन्हा वनप्राण्याचा मानवी वस्तीजवळ वावर; वन विभागाच्या दाव्यामुळे संभ्रम, ग्रामस्थांमध्ये संताप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील मुंडीपार सडक येथे गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास चांगदेव सिरसागर यांच्या घरात शिरून एका वन्यप्राण्याने शेळी फस्त केल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, हल्ला करणारा प्राणी नेमका वाघ की बिबट्या, यावरून वन विभाग आणि ग्रामस्थांच्या दाव्यांमध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा बिबट्या असून त्याने शेळीवर हल्ला केला. मात्र, घटनास्थळी प्राणी पाहिल्याचा दावा करणारे प्रत्यक्षदर्शी आणि ग्रामस्थ हा बिबट्या नसून वाघच असल्याचे ठामपणे सांगत आहेत. विशेष म्हणजे, या प्राण्यासोबत दोन बछडेही असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे वन विभागाच्या माहितीवर आणि प्रत्यक्षदर्शांच्या दाव्यावरून परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहाटे साडेतीन वाजता सिरसागर यांच्या घरात शिरून शेळीची शिकार केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा त्याच परिसरात या वनप्राण्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घराभोवती वल कंपाऊंड असतानाही थेट घरात प्रवेश करून शेळी फस्त करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावातील लहान मुले, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वन विभाग म्हणतो बिबट्या, ग्रामस्थांचा दावा वाघाचा!

या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वन्यप्राणी बिबट्या असल्याचे सांगितले आहे. मात्र, घटनास्थळी प्राण्याला पाहिल्याचा दावा करणारे ग्रामस्थ वन विभागाच्या या माहितीशी सहमत नाहीत. त्यांच्या मते, शेळीवर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून वाघ आहे, एवढेच नाही, तर त्याच्यासोबत दोन बछडेही असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. त्यामुळे वन विभागाने नेमकी कोणती माहिती आणि कोणत्या निरीक्षणाच्या आधारे बिबट्या असल्याचे सांगितले, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्राण्याची खात्रीशीर ओळख पटवून नागरिकांना स्पष्ट माहिती देण्याची मागणी होत आहे.

भेलच्या तुटलेल्या कंपाऊंडमधून गावात शिरकाव?

मुंडीपार सडक हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून बाम्हणी गावाच्या जवळ आहे. या परिसरात शेती आणि जंगल क्षेत्र लागून आहे. त्यातच भेल कंपनीच्या वॉल कंपाऊंडला अनेक ठिकाणी भगदाडे पडली असून काही भागातील भिंत तुटलेली आहे. कंपाऊंडच्या आतील परिसर निर्जन आणि सुनसान असल्याने वन्यप्राण्यांना या मार्गाने गावात प्रवेश करण्याची संधी मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या तुटलेल्या भिंतीच्या मार्गाने याचा वावर गावाच्या दिशेने वापर होत असल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

आणखी किती दिवस नागरिकांनी दहशतीत जगायचे?

८ नोव्हेंबर रोजी एका युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतरही या परिसरात वनप्राण्यांचा मानवी वस्तीजवळ वावर सुरूच आहे. पहाटे घरात शिरून शेळी फस्त करणे आणि पुन्हा काही तासांत त्याच परिसरात दर्शन देणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. वन विभाग आणि प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांच्या माहितीमध्येच फरक असेल, तर सर्वप्रथम संबंधित प्राण्याची अचूक ओळख पटविणे आवश्यक आहे. कारण प्राणी वाघ असो अथवा बिबट्या, नागरिकांच्या जीवित्वाला निर्माण झालेला धोका मात्र नाकारता येणार नाही.

विशाल उईकेच्या मृत्यूची आठवण ताजी असतानाच पुन्हा दहशत

गत ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाम्हणी येथील शेतशिवारात धान कापणीचे काम सुरू असताना वाघाने २७ वर्षीय विशाल कैलास उईके याच्यावर हल्ला केला होता. विशाल हा आपल्या आई-वडिलांसोबत शेतात धान कापणी करीत असताना अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता.

त्या घटनेनंतर वन विभागाकडून वाघाला पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पिंजरे लावणे, शूटर टीमच्या माध्यमातून शोधमोहीम राबविणे तसेच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. मात्र, ८ नोव्हेंबरपासून या भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघाला अद्याप जेरबंद करण्यात यश आलेले नाही. आता मुंडीपार सडक येथे घरात शिरून शेळी फस्त करण्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा वन विभागाच्या मोहिमेच्या प्रभावीपणाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

दोन बछड्यांसह वाघाचा वावर असल्याचा ग्रामस्थांचा दावा

शेळीवर हल्ला करणाऱ्या प्राण्यासोबत दोन बछडे असल्याचा ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे परिसरातील वनप्राण्यांच्या हालचालींबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. गावालगतचे शेतपरिसर, जंगल परिसर आणि भेल कंपनीच्या तुटलेल्या कंपाऊंडमुळे वनप्राण्यांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी मार्ग उपलब्ध होत असल्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

ग्रामस्थांनी वन विभागाकडे या परिसरासाठी विशेष पथक तैनात करण्याची मागणी केली आहे. भेल कंपनीच्या वॉल कंपाऊंडची तातडीने दुरुस्ती करून सर्व तुटलेल्या जागा बंद कराव्यात, नियमित गस्त वाढवावी, वनप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, तसेच गावात जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

वन विभागाने केवळ शोधमोहीम राबविण्यापुरते मर्यादित न राहता प्रतबध्दतेच्या म्हणण्यावेळी गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित प्राण्याची खात्रीशीर ओळख पटवून नागरिकांना वस्तुस्थिती सांगावी आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. वन विभागाच्या दाव्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती स्पष्ट करणारी कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षेची ठोस हमी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *