भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी येथील श्री. लक्ष्मण किळंगुजी गिऱ्हेपुजे (वय ६८) या वृद्ध शेतकऱ्यावर माकडाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. भारत गॅस गोडाऊनसमोरील शेतशिवारात ते शेतातील काम करीत असताना अचानक एका माकडाने त्यांच्या मांडीवर चावा घेतला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडीला मोठी जखम होऊन रक्तस्त्राव झाला.
घटनेनंतर जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना तसेच शेतशिवारातून ये-जा करताना माकडांच्या हल्ल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतीची कामे करताना शेतकरी घास्तावले आहेत.
या घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन संबंधित माकडांना पकडावे आणि त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.
