धान खरेदी केंद्रांना सोयीसुविधा द्या अन्यथा जबाबदारी बाजार समितीवर – धान खरेदी संघ

 

थकीत साहित्याची आर्थिक भरपाई देण्याची मागणी; हंगामापूर्वी सुविधा न मिळाल्यास संस्थेवर आर्थिक दंडाचा धोका

 

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

तुमसर : शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान खरेदी करणाऱ्या संस्थांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मागील अनेक वर्षांपासून आवश्यक साहित्य व मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत। आगामी २०२६-२७ च्या खरीप धान खरेदी हंगामापूर्वी सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सन २०१५ पासून न पुरविलेल्या साहित्याचा हिशोब करून त्याची आर्थिक भरपाई द्यावी, अन्यथा त्यास बाजार समितीला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ‘तुमसर-मोहाडी तालुका शासकीय धान खरेदी संघाच्या’ वतीने देण्यात आला आहे।

या संदर्भात संघाच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिवांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाच्या प्रती भंडारा जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी आणि तुमसर-मोहाडीचे आमदार कारेमोरे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून धान खरेदी, साठवणूक आणि प्रशासकीय कामकाजासाठी विविध साधनांची आवश्यकता असते। मात्र, अनेक वर्षापासून बाजार समितीकडून आवश्यक साहित्य दिले जात नाही, पूर्वी मिळणारी १० टक्के रक्कमही बंद करण्यात आली आहे, तसेच खरेदी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियोजन बैठकही घेतली जात नसल्याची खंत संघाने व्यक्त केली आहे।

साहित्याअभावी केंद्र चालक संस्थांना स्वतःच्या आर्थिक भांडवलातून खर्च करावा लागत असून, त्यामुळे संस्थांवर मोठा आर्थिक भार पडत आहे। खरेदी काळात केंद्रीय पथकाकडून केंद्रांची तपासणी होते; त्यावेळी भौतिक सुविधांची कमतरता आढळल्यास संस्थांवर आर्थिक दंड आकारला जातो। भविष्यात संस्थांना असा दंड बसल्यास त्यास बाजार समिती जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे।

आगामी २०२६-२७ च्या हंगामापूर्वी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व वजनमापन यंत्रे, आर्द्रतामापक यंत्र (मॉइश्चर मीटर), दर्जेदार ताडपत्री, पंखे, चाळणी, पॉलिथिन शीट, सुतळी, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तसेच संगणक, प्रिंटर, मोबाईल व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। यासोबतच शेतकऱ्यांसाठी निवारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवीण कहालकर यांच्यासह खरेदी केंद्राच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *