आदिशक्ती योगी लक्ष्मणनाथबाबा लेंडे अनंतात विलीन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी

मोहाडी : तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहगाव देवी येथील तपस्थळी आश्रम तथा शक्तीमाता मंदिराचे प्रमुख आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आदिशक्ती योगी लक्ष्मणनाथबाबा लेंडे (तात्याजी) यांचे गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ ला पहाटे १.३० वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोहगाव देवी परिसरासह जिल्ह्यातील भाविक, भक्तगण व अनुयायांमध्ये शोककळा पसरली।

पूज्य लक्ष्मणनाथबाबा हे मोहगाव देवी येथील आदिशक्ती माता मंदिर व तपस्थळी आश्रमाचे प्रमुख होते। धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्यांना मानणारा मोठा भक्तपरिवार असून, जिल्हाभरात त्यांचे हजारो अनुयायी आहेत। त्यांच्या निधनामुळे आपले श्रद्धास्थान असलेले आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली। शुक्रवार दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.१० वाजता मोहगाव देवी येथील आदिशक्ती माता मंदिर व तपस्थळी आश्रम परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट, भाविक, अनुयायी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी पूज्य बाबांना अखेरचा निरोप देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। अंत्यसंस्कारप्रसंगी जाधवराव साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा आयोजित करण्यात आली होती।

या शोकसभेत आमदार राजू माणिकराव कारेमोरे, मनोज स्वामी, गोविंद भुरे, अनिल पोटभरे, मोतीराम चौधरी, हरित रेवतकर, नंदकिशोर मिश्रा व हरिभाऊ थोटे यांनी शोकसंवेदना व्यक्त करून पूज्य बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी पूज्य बाबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। भंडारा येथील सुप्रसिद्ध डॉ. जगदीश लेंडे यांचे ते वडील तर पवनी येथील बाजार चौकातील औषध व्यावसायिक प्रवीण सावजी मुंडले यांचे आजोबा होत। त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे। पूज्य आदिशक्ती योगी लक्ष्मणनाथबाबा लेंडे यांच्या निधनाबद्दल मोहगाव देवी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील भाविक व अनुयायांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *