तमाशाचा फड, जत्रेची धूम अन् सोयरीक जुळवण्याचा अनोखा योग; ग्रामीण संस्कृतीची परंपरा आजही कायम
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
सिल्ली : ग्रामीण भागातील मंडई म्हणजे केवळ मनोरंजनासाठी भरलेली जत्रा नव्हे, तर नात्यागोत्यांना एकत्र आणणारा, माणसांमधील आपुलकी वाढवणारा आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा आनंदोत्सव होय। आधुनिकतेच्या युगात शहरांमध्ये मोठमोठे मॉल, चित्रपटगृहे आणि मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध झाली असली, तरी गावोगावी भरणाऱ्या मंडईचे महत्त्व आजही कायम आहे। मातीचा सुगंध, माणुसकीचा ओलावा आणि नात्यांची घट्ट वीण जपणारी मंडई ही ग्रामीण जीवनातील एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा बनली आहे।
गावात मंडई भरणार म्हटले की, आठवडाभर आधीपासूनच घराघरांत उत्साहाचे वातावरण निर्माण होते। घरांची स्वच्छता, अंगण सारवणे, रंगरंगोटी करणे, पाहुण्यांच्या स्वागताची तयारी आणि बाजारहाटाची लगबग सुरू होते। माहेरवाशिणी, जावई, नातेवाईक आणि दूरवर राहणाऱ्या आप्तेष्टकांना मंडईचे निमंत्रण दिले जाते। वर्षभर कामाच्या व्यापामुळे एकमेकांना भेटता न येणारी माणसे या निमित्ताने एकत्र येतात। त्यामुळे मंडई हा केवळ गावचा उत्सव न राहता कुटुंबीयांच्या स्नेहसंमेलनाचा सोहळा ठरतो।
गावाला येते यात्रेचे स्वरूप
मंडईच्या दिवशी गावाला जणू नवे रूप प्राप्त होते। सकाळपासूनच बैलगाड्या, ट्रॅक्टर, मोटारसायकली आणि इतर वाहनांची गावात वर्दळ वाढते। लांबून आलेले पाहुणे, माहेरवाशिणी, जावई आणि सासरवाडीची मंडळी यांच्यामुळे गावातील प्रत्येक घर गजबजून जाते। पाहुण्यांच्या गप्पागोष्टी, चहा-पाण्याच्या पंगती, जुन्या आठवणी आणि सुख-दुःखाच्या गप्पांमध्ये दिवस कसा निघून जातो, हे कळतही नाही। वर्षातून एकदा होणाऱ्या या भेटीमुळे नात्यांमधील जिव्हाळा अधिक दृढ होतो।
तमाशाच्या फडाची रंगत अन् ढोलकीचा ठेका
मंडईच्या उत्सवातील सर्वाधिक आकर्षण म्हणजे तमाशाचा फड। संध्याकाळ होताच गावातील मोकळ्या पटांगणात सामाजिक नाटके, प्रबोधनात्मक कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम आणि तमाशाचे फड रंगू लागतात। ढोलकीचा ठेका, तुणतुण्याचे सूर, घुंगरांची छमछम आणि वगनाट्यातील संवाद यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून जातो।
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण या कार्यक्रमांचा आनंद घेतात। विशेषतः तमाशातील लावणी, गण-गवळण आणि वगनाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवतात। मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे मंडईची रंगत अधिकच वाढते। अनेक दिवस या कार्यक्रमांची चर्चा गावागावांत सुरू असते।
खेळणी, पाळणे अन् खाद्यपदार्थांची रेलचेल
मंडईच्या निमित्ताने भरणाऱ्या जत्रेत विविध वस्तूंची दुकाने थाटली जातात। रंगीबेरंगी खेळणी, फुगे, पाळणे, मिठाई, जिलेबी, चाट, भेळ आणि इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांमुळे जत्रेला वेगळेच शोभा येते। महिलांसाठी बांगड्या, साड्या, सौंदर्यप्रसाधने आणि दागिन्यांची दुकाने आकर्षणाचे केंद्र ठरतात। तर लहान मुलांसाठी खेळणी आणि पाळणे ही आनंदाची पर्वणी असते।
जत्रेत फेरफटका मारताना खिशातील पैसे कधी संपतात, याचा पत्ताही लागत नाही। मात्र, खरेदीतून मिळणारा आनंद आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले क्षण मनाला समाधान देऊन जातात। त्यामुळे आर्थिक परिस्थिती कशीही असली, तरी प्रत्येकजण आपल्या परीने मंडईचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो।
सोयरीक जुळविण्याचेही महत्त्वाचे ठिकाण
ग्रामीण भागात मंडईला सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे। नातलगांच्या भेटीगाठींबरोबरच मुला-मुलींचे विवाह जुळविण्यासाठीही मंडईचा उपयोग केला जाता। पाहुण्यांच्या गर्दीत मुलगा किंवा मुलगी पाहण्याचे कार्यक्रम होतात। नातेवाईकांमध्ये विवाहासंदर्भात चर्चा रंगतात। लग्नाची बोलणी, सोयरीक जुळविणे आणि नव्या नात्यांची सुरुवात अशा अनेक गोष्टी मंडईच्या निमित्ताने घडून येतात। अनेक कुटुंबांमध्ये जुळलेल्या विवाहसंबंधांची सुरुवात अशाच मंडईतील भेटीतून झालेली असते।
परंपरा जपणारा ग्रामीण संस्कृतीचा उत्सव
आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीच्या काळात माणसांमधील प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे। अशा परिस्थितीत ग्रामीण मंडई माणसांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे। मनोरंजन, व्यापार, नातेसंबंध, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम म्हणजे मंडई होय।
काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली आणि जीवनशैलीतही मोठे परिवर्तन झाले; मात्र ग्रामीण जनमानसातील मंडईचे आकर्षण कमी झालेले नाही। कारण मंडई ही केवळ खरेदी-विक्री किंवा मनोरंजनाची जागा नसून गावाच्या सामूहिक आनंदाची, आपुलकीची आणि संस्कृतीची ओळख आहे। म्हणूनच ग्रामीण भागातील मंडईची परंपरा पुढील पिढ्यांनीही जपणे गरजेचे आहे।
