मित्राच्या पत्नीनेच दिली हत्येची सुपारी: वर्षा तुरकर हत्याकांड प्रकरण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पुणे विमानतळावरील एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या वर्षा तुरकर यांच्या गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगलात झालेल्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा करण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे. या हत्याकांडामागील कारण समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीचे वर्षा तुरकर यांच्यासोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने पत्नीनेच हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

वर्षा यांची हत्या करण्यासाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात पतीच्या पत्नीला कटातील मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली असून, तिच्यासह एकूण चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर अन्य दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात १४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे वास्तव्यास असलेल्या वर्षा धुर्नलाल तुरकर यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. वर्षा या पुणे विमानतळावर एअर इंडियामध्ये कार्यरत होत्या. त्या आपल्या मैत्रिणीच्या भेटीसाठी गोंदिया जिल्ह्यात आल्या होत्या.

यावेळी गोंदियातील मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत त्या तिरोडा येथे गेल्या होत्या. तेथून परत येत असताना बोंडराणी जंगलातील शिवमंदिराजवळ अज्ञात तिघांनी त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पोलिस- ांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. १४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या हत्येप्रकरणी दवनीवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सं-ि हतेच्या कलम १०३ (२) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविचंद्र सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली सहा तपास पथके तयार करण्यात आली.

या पथकांनी तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी, बालाघाट ते गोंदिया या मार्गावरील जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेºयांची सलग चार दिवस तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान मृतक वर्षा यांच्यासोबत असलेल्या नितेशअग्रवाल याच्या वाहनाचा पाठलाग करताना संशयित आरोपी मोटारसायकलवरून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी गोंदिया शहरातील मुरी परिसरातून इमरान करीम शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या हत्याकांडातील कटाचा उलगडा झाला. नितेश अग्रवाल आणि वर्षा तुरकर यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे नितेशची पत्नी मोना अग्रवाल अस्वस्थ होती.

याच प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून तिने वर्षा यांची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले. या कटासाठी मोना अग्रवाल हिने तिच्या घराजवळ राहणाºया कुणाल कुंभलकर याची मदत घेतली. कुणालने शाह रुख खान पठाण याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्षा तुरकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे, वर्षा यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी नितेश अग्रवाल यांच्या वाहनातीलजीपीएस यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

या जीपीएस यंत्रणेची माहिती आणि पासवर्ड आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी इमरान करीम शेख (वय २६, रा. संजयनगर, मुरी, गोंदिया), शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय ३३, रा. सिंधी कॉलनी, गोंदिया), कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय ३१, रा. साई मंदिराजवळ, सुषील लाईन, गोंदिया) आणि मोना नितेश अग्रवाल (वय ४२, रा. साई मंगलम लॉन परिसर, गोंदिया) या चार आरोपींना अटक केली आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि दवनीवाडा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट एका महिलेच्या निर्घृण हत्येत झाल्याने या घटनेने गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेºयांची तपासणी आणि चार दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला आहे. आता फरार आरोपींना अटक करण्यासोबतच हत्येच्या कटातील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *