
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या साखळीवर घाव घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची बिनधास्त वाहतूक करणाºया आरोपीला रंगेहात पकडत ९८५ ग्रॅम गांजा व दुचाकी असा १.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेस कारंजा- फुलचूर मार्गावर गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचत संशयितास अडवले.
पंचासमक्ष अंगझडतीत आरोपी किशोर सुह- ाकार हातझाडे (३४), रा. मालकानपूर, ता. अर्जुनी मोर याच्याकडील प्लास्टिक पिशवीमध्ये सेलो टेपने गुंडाळलेला गांजाचा बंडल आढळून आला. तपासणीत ९८५ ग्रॅम ओलसर पाने, फुले व बिया मिश्रित गांजा (किंमत १९,७०० रुपये) तसेच वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी (किंमत १ लाख रुपये) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौकशीत आरोपीने गांजा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणे येथे एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब), (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक फौजदार राजू मिश्रा, भुवनलाल देशमुख तसेच पथकातील पोलिस कर्मचारी महेश मेहर, संजय चव्हाण, इंद्रजित बिसेन, प्रकाश गायधने, छगन विठ्ठले, स्मिता तोंडरे, कुमुद येरणे, राम खंदारे यांनी केली.