भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी महसूल विभागाने कारवाई सुरू केली आहे. गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोडमोहाडी परिसरात गस्तीदरम्यान विनापरवाना रेती वाहतूक करणारा टिप्पर महसूल पथकाने पकडला.
तहसीलदार नारायण ठाकरे यांच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेले ग्राम महसूल अधिकारी गस्त घालत असताना गोडमोहाडीकडून येणारा टिप्पर रेती वाहतूक करताना आढळला. पथकाने टिप्पर थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रिन्स राजू पाटील, रा. पारडी, नागपूर असे सांगितले. तसेच रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले.
त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी अजय बिसेन यांनी तहसीलदारांच्या सूचनेनुसार सदर टिप्पर तिरोडा पोलीस ठाण्यात जमा केला. या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार नारायण ठाकरे यांनी प्रकरण उपविभागीय अधिकारी, तिरोडा यांच्याकडे पाठविले आहे. अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल विभागाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
