■ प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित■ १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशनच्या खाण प्रकल्पातील थकीत वेतन, भत्ते व ग्रॅच्युईटीच्या रकमेसाठी गेल्या २३ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या वृद्ध कामगारांच्या आंदोलनाला अखेर सकारात्मक वळण मिळाले आहे. २६ नोव्हेंबर संविधानदिनी लाखांदूर तहसील कार्यालयासमोर सात वृद्ध कामगारांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्त स्थगित करण्यात आले.
या सात कामगारांचे वय ८० ते ८५ वर्षांच्या दरम्यान असून, वृद्धापकाळातही त्यांना हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागत आहे. बारमाही रोजंदारी मजूर कामगार संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष युवराज रामटेके यांनी उपोषणाचे नेतृत्व केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने सायंकाळी चर्चा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार वैभव डी. पवार आणि उपविभागीय दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार खाण प्रकल्पातील जप्त साठ्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप व जिल्हा खनिकर्म विभागामार्फत मूल्यांकन करण्यात येणार आहे. तसेच कामगारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देऊन साठ्याच्या लिलावासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर संघटनेने १५ दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार वैभव डी. पवार यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. मात्र, १५ दिवसांत आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. त्यामुळे २३ वर्षापासून प्रलंबित असलेल्या वृद्ध कामगारांच्या हक्काच्या रकमेचा प्रश्न आता तरी मार्गी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
