बर्लिनमध्ये हजारो भारतीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या उपस्थितीत पाच तास विसर्जन मिरवणूक!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशोत्सव प्रत्येक मराठी आणि भारतीय माणसाच्या जिव्हाळ्याचा सण आहे. मराठी माणूस जगभरात जिथे जिथे गेला आहे त्या त्या ठिकाणी सण तो मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करत आहे. जगभरात वेगवेगळ्या देशांमधील मराठी मंडळे मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतांना दिसत आहे. जर्मनीमध्येही अनेक शहरांमध्ये मराठी संस्कृतीचे जतन आणि प्रसार करणारे समूह सक्रीय आहेत, की जे सर्व मराठी सण साजरे करतात. त्याचीच प्रचिती जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात देखील येते. ‘मराठी मित्र बर्लिन’ दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आले आहे. वर्ष २०२२ हे खास आहे! इतिहासात पहिल्यांदा पुण्याचे ग्रामदैवत श्रीं कसबा पेठ गणपतीची प्रतिमूर्ती सातासमुद्रापलीकडे बर्लिनमध्ये आणण्यात आली. ३१ आॅगस्ट २०२२ गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात श्रींच्या मूर्तीची स्थापना रोजी ढोल-ताशाच्या गजरात श्री गणेश मंदिरात उभारलेल्या ‘शनिवारव- ाड्या’च्या देखाव्यात करण्यात आली. या समयी हजारो भाविकांनी ह्या शुभ कार्याचा आनंद घेतला.

सम्पूर्ण युरोप मध्ये पहिल्यांदाच दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव बर्लिनमध्ये साजरा करण्यात आला. ह्या गणेशोत्वाच्या माध्यमातून जगभरातील गणेश भक्तांपर्यंत बर्लिन मधील श्री गणेश मंदिराची माहिती पोहचावी, बर्लिन मधील भारतीय तसेच भारतीय संस्कृतीत रस असणाºया सर्वांना एकत्र आणावे आणि ह्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाणीचे एक व्यासपीठ तयार व्हावे हा ह्या उत्सवा मागील हेतू आहे. श्री गणेश हिंदू मंदिर, मराठी मित्र बर्लिन आणि रमणबाग युवा मंच जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणाºया १० दिवसांच्या ह्या अभूतपूर्व उत्सवात बर्लिनमधील सर्व जनांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच सकाळ आणि सायंकाळच्या आरतीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीने शेकडो मराठी आणि भारतीयांनी सहभाग घेतला. बर्लिनवासी श्रीमती भांगले यांचे वडील हर्डीकर हे भारतामधून बर्लिनमध्ये भेटीसाठी आलेले आहेत. त्यांनी व दिगंबर बर्वेंनी सकाळ-संध्याकाळ श्रींच्या पूजेची आणि आरतीची मनोभावे सेवा केली. उत्सवानिमित्त ०४-सप्टेंबर-२०२२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम श्री गणेश मंदिरात संपन्न झाला. ह्या व्यासपीठावर २५ लहान-थोरांनी भारतीय कलेचे अप्रतिम सांस्कृतिक प्रदर्शन/कार्यक्रम सादर करण्यात आले. परदेशामध्ये राहून सुद्धा भारतीय कलेची साथ आणि आराधना बर्लिनमधील मराठी तथा इतर भारतीयांनी सोडली नाही हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे! १० दिवसांच्या ह्या अभूतपूर्व उत्सवाची सांगता भव्य आणि नेत्रदीपक विसर्जनाच्या मिरवणुकीने झाली. ह्या मिरवुणकीची शान म्हणजे पारंपारिक शिसवी लाकडाने घडवलेल्या आणि सुंदररित्या सजवलेल्या अशा पालखीमध्ये बाप्पांना विराजमान करण्यात आले.

ह्या मिरवणुकीत बाप्पांच्या पालखीसमोर महाराष्ट्राच्या ५० पारंपारिक ढोल-ताशे वादकांनी आणि ३० महिलांच्या तालबद्ध लेझीम नृत्याने बहार आणली. पुढे ही मिरवणूक हरमानप्लाट्झच्या चौकात गेली, जेथे हजारो लोकांनी ह्या मिरवणुकीचा आनंद घेतला. अवघी पंढरी जशी विठ्ठलमय होते तशी आज बर्लिन नगरी ढोल ताशे आणि लेझीमच्या तालामध्ये ‘गणपती’मय झाली होती! अशाच भारावलेल्या वातावरणात ही मिरवणूक साधारण एक ते दीड तासात फोक्सपार्क हासनहायड येथे आली आणि तेथेही शेकडो लोकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात मिरवणुकीत सहभाग घेतला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी बर्लिनमधील भारताचे मान्यवर राजदूत पी हरीश होते. बर्लिनच्या उपसभापती डॉ. बहार हघनीपूर, आमदार डॉ. सुझैन खलेफेल्ड तथा अनेक सरकारी अधिकारी, राजकारणी, व दूतावासाचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती उल्लेखनीय. ह्याच जयघोषात मिरवणूक आणि बाप्पांच्या पालखीचे पुन्हा मंदिराजवळ आगमन झाले. माननीय राजदूत, ‘मराठी मित्र, बर्लिन’ च्या सदस्यांनी महन्मंगल महाआरती नंतर बाप्पाचे विसर्जन केले. महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. ह्यावर्षीच्या उत्सवाची खास उल्लेखनीय बाब म्हणजे फक्त मराठीच नाही तर इतर भारतीय व अभारतीय लोकांनी मोठ्या उत्साहाने घेतलेला सहभाग. हा सोहळा लोक सहभाग आणि लोक वर्गणीतुन साजरा झाला. खºया अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव आणि महान भारतीय संस्कृतिचे आणि एकजुटीचे प्रतीक!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *