चुलबंद नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त सापडेना?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली ते सानगडी मार्गांवरील धर्मापुरी गावालगत असलेल्या चुलबंद नदीच्या पुलाचा दर्शनी भाग तुटलेला आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी तिथे दिड ते दोन महिन्यापासून साहित्य आणून ठेवले आहे. परंतु अजूनपर्यंत संबंधित विभागाला दुरुस्तीचा मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे असे वाटते की, याठिकाणी मोठा अपघात झाल्यावरच दुरुस्ती केली जाईल. सदर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग बनला आहे. या मार्गांवरील दिवसरात्र वाहतूक बघता किरकोळ दुरुस्तीचे काम लवकर व्हायला पाहिजे. परंतु शेवटी प्रशासन आहे, कुणाचा तरी जीव घेतल्याशिवाय ही यंत्रणा गंभीर होत नाही. तालुक्यातील नेते मंडळींही त्याच माळ्यातील मनी आहेत. डोळ्यादेखत सर्व दिसत असतानाही कुणी आवाज करीत नाहीत. घटना घडली की, मग तिथे राजकारण आणून रस्ते अडवून आंदोलने केली जातात. पुलावर आणून ठेवलेल्या साहित्यावर रात्रीच्या वेळी कुठलेही वाहन आपटून नदीत पडू शकते. तसेच सदर दुरुस्तीचे काम मंजूर झाले आहे की, कंत्राटदाराने मलाच कंत्राट मिळावे म्हणून साहित्य आणून ठेवले हेही कोडेच आहे. महिनोमहिने साहित्य आणायचे वा काम करायचे नाही ही अलीकडे पद्धत बनली आहे. एवढे मात्र निश्चित की, जीव गेल्याशिवाय हे काम होणार नाही. साकोली तालुक्याचे राजकीय नेतृत्व ढिसाळ झाले आहे. रोखठोक काम करून घेणारे नेतृत्व नाही. केवळ आपापले स्वार्थ साधून सामान्य लोकांच्या जीवाचा खेळ मांडला आहे. त्याचाच हा प्रकार आहे. कुणाचा जीव गेल्यावर या पूल दुरुस्तीचे काम होईल का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *